बीड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर घरकुलांना मंजुरी
टीम AM : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हावासीयांना ऐन सणासुदीच्या काळात मोठे गिफ्ट दिले असून, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून जिल्ह्यासाठी तब्बल 28 हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.
याबाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये एका शासन निर्णयाद्वारे 17081 तर दुसऱ्या शासन निर्णयाद्वारे 9941 अशा एकूण 28 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांचे याबद्दल आभार मानले आहेत.
विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील गरजू नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतुन स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये निधी दिला जातो.
बीड जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राप्त प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवण्याबाबत जिल्हास्तरीय समितीने निर्णय घेऊन प्राप्त प्रस्तावांची यादी राज्य शासनास सादर केली, त्यानुसार पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून तब्बल 28 हजार घरकुलांना एकाच वेळी मंजुरी देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात तालुकानिहाय आकडेवारी पाहता, घरकुलांसाठी एकत्रित पणे इतक्या मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर करण्यात आले आहेत, धनंजय मुंडे यांच्या आग्रही भूमिकेमुळे हे होऊ शकले, असे बोलले जात आहे. जिल्ह्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने एका योजनेतून घरकुलांना मंजुरी मिळण्याची ही पहिलीच वेळ असून, यामध्ये सर्व तालुक्यांना न्याय देण्यात आला आहे.