अंबाजोगाई पोलिस ठाण्यात दिली लेखी फिर्याद : राजकीय वर्तुळात खळबळ
टीम AM : महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ख्याती देशासह संपूर्ण जगभर आहे. अनेक देशांत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री देखील त्यांच्या कार्याला सलाम करीत नतमस्तक होतात. परंतू, अंबाजोगाई तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये लाजीरवाणा प्रकार उघडकीस आला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मधोमध चक्क एका माजी मंत्र्यांचा फोटो लावण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणावर निवडून यायचं आणि त्यांच्याच बाजूला फोटो लावायचा ही निषेधार्ह घटना जोगाईवाडी / चतुरवाडी ग्रामपंचायतीमध्ये घडली होती. या घटनेमुळे केज मतदारसंघातील जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. या घटनेला आता एक वेगळेच वळण मिळाले असून संबंधितांवर ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानोबा कांबळे यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी येथील शहर पोलिस ठाण्यात रितसर फिर्यादही दिली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत ज्ञानोबा कांबळे यांनी असे म्हटले आहे की, जोगाईवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथे सरपंच मनिषा बालासाहेब दोडतले आहेत तर उपसरपंच सुनिल बाबूराव मस्के आहेत. त्या दोघांच्या पक्षांचे नेते अक्षय नंदकिशोर मुंदडा आणि नंदकिशोर शिवभगत मुंदडा हे दोघे आहेत. वरिल चौघांनी संगनमत करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचा अनादर करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय जोगाईवाडी येथील शासकीय कार्यालयात विमल मुंदडा यांचा फोटो वरिल तिन्ही महापुरुषांच्या बरोबरीने लावलेला आहे. त्यासोबतच नंदकिशोर मुंदडा यांचा फोटो भिंतीवर लावलेला आहे. बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर ही बाब प्रसिद्ध झाली आहे. वरील प्रकाराबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या घटनेचा निषेध करुन कायदेशीर कार्यवाही करण्याची लेखी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. परंतू, अद्याप कायदेशीर कार्यवाही झाली नाही.
वरिल चारही जण गैर अनुसूचित जातीचे आहेत. मी अनुसूचित जाती पैकी चांभार जातीचा सदस्य आहे. माझ्या सहित सर्व अनुसूचित जाती आणि जमातीचा समूह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अत्यंत आदर करतो. वरिल महापुरुषांच्या शेजारी विमल मुंदडा यांचा फोटो लावून मनिषा बालासाहेब दोडतले, सुनिल बाबूराव मस्के, अक्षय नंदकिशोर मुंदडा, नंदकिशोर शिवभगत मुंदडा यांनी अनादर केला आहे. तरी त्यांच्या विरुद्ध माझी लेखी कायदेशीर फिर्याद आहे. तरी त्यांच्या विरुद्ध ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करुन त्वरित कार्यवाही करण्यात यावी हि नम्र विनंती, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावर ज्ञानोबा लक्ष्मणराव कांबळे यांची स्वाक्षरी आहे. या निवेदनाची प्रत पोलिस अधीक्षक, बीड आणि नागरीक हक्क संरक्षण दल बीड यांना देण्यात आली आहे.