विधानसभा निवडणूक : दसऱ्यानंतर आचारसंहिता आणि दिवाळीनंतर मतदान, वाचा… 

टीम AM : राज्य विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता 12 ऑक्टोबरला आलेला दसरा उत्सव होताच कोणत्याही क्षणी लागू होईल आणि मतदान मात्र दिवाळीनंतर घेतले जाईल, असे स्पष्ट संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या पत्रकार परिषदेतून शनिवारी मिळाले.

ही निवडणूक एकाच टप्प्यात घ्या, अशी सर्वपक्षीय मागणी पुढे आली असली, तरी त्याबद्दलचा निर्णय आयोगाने घेतलेला नाही.

विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपते, त्याआधी विधानसभा निवडणूक पार पडून नवी विधानसभा अस्तित्वात येईल, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या तारखांबाबत राजकीय पक्षांनी केलेल्या सूचनांचा संदर्भ लक्षात घेता 19 ते 21 नोव्हेंबरदरम्यान विधानसभेचे मतदान घेतले जाऊ शकते. त्यानुसार आचारसंहिता 18 ऑक्टोबरच्या आसपास लागण्याची शक्यता आहे. निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवसांपासून मुंबईत होता. या दौर्‍याचा समारोप करताना झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सर्व माहिती माध्यमांना दिली.