खा.‌ अजित गोपछडे ॲक्शन मोडवर : ‘स्वाराती’ रुग्णालयात मॅरेथॉन बैठक, समस्यांचा घेतला आढावा

कॅन्सर आणि ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयासाठी प्रयत्न करणार

टीम AM : ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय विविध समस्यांनी ग्रासले आहे. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. याचीच दखल घेत राज्यसभेचे खासदार डॉ. अजित घोरपडे यांनी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील समस्यांबाबत अधिष्ठाता कार्यालयात आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी मॅरेथॉन बैठक घेतली. ही बैठक जवळपास तीन तास चालली. या बैठकीत त्यांनी परिचारिका, निवासी डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काही समस्यांचे त्यांनी पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंत्यांना फोन लावीत जाग्यावर निराकरण केले. दरम्यान, खा. अजित गोपछडे यांचं वैद्यकीय आणि पदव्युत्तर शिक्षण ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयातचं झाले असल्याने त्यांनी सर्व समस्या आस्थेवाईकपणे समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.

पत्रकारांशी साधला संवाद

खा. अजित गोपछडे यांनी ‘स्वाराती’ रुग्णालयातील आढावा बैठकीतून वेळ काढीत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना गोपछडे म्हणाले की, माझं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण याच वैद्यकीय महाविद्यालयात झाले असून येथील समस्यांची मला चांगली जाणीव आहे. त्यावेळी देखील निवासी डॉक्टरांच्या समस्येसाठी मी लगातार आठ दिवस आंदोलन केले होते. तेंव्हाही परिस्थिती तशीच होती आणि अजूनही त्यात काही बदल झालेला दिसून येत नाही. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. आज विद्यार्थ्यांची संख्या 50 वरुन 150 झाली आहे. परंतू, मनुष्यबळ आहे तितकेच आहे. राज्यसभेचा खासदार या नात्याने येणाऱ्या काळात हे चित्र नक्कीच आपल्याला बदलेलं दिसेल, यासाठी मी केंद्राकडे आणि राज्य सरकारकडे प्रतिष्ठा पणाला लावेल, असे त्यांनी आश्वासित केले. 

कॅन्सर आणि ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयासाठी प्रयत्न करणार

डॉ. गोपछडे बोलताना पुढे म्हणाले की, ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला स्थापन होऊन 50 वर्षे होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. हा निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी मी केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्याशी लगेचच भेटणार आहे. त्यासोबतच ‘स्वाराती’ त स्वतंत्र कॅन्सरचे रुग्णालय आणि ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळात ही दोन्ही मुद्दे मार्गी लागलेले आपल्याला दिसतील, असे मी आश्वासित करतो, असे गोपछडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या पत्रकार परिषदेला ‘भाशिप्र’ चे माजी कार्यवाह नितीन शेटे आणि युवा नेते विनोद पोखरकर उपस्थित होते. पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती.