टीम AM : महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ख्याती देशासह संपूर्ण जगभर आहे. अनेक देशांत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री देखील त्यांच्या कार्याला सलाम करीत नतमस्तक होतात. परंतू, अंबाजोगाई तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये लाजीरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मधोमध चक्क एका माजी मंत्र्यांचा फोटो लावण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणावर निवडून यायचं आणि त्यांच्याच बाजूला फोटो लावायचा ही निषेधार्ह घटना जोगाईवाडी / चतुरवाडी ग्रामपंचायतीमध्ये समोर आली आहे. या घटनेमुळे केज मतदारसंघातील जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. ‘त्या’ ठिकाणाहून तात्काळ फोटो हटविण्यात यावा आणि संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, केज मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी/ चतुरवाडी या ग्रूप ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावण्यात आले आहेत. फोटो लावण्याबाबत कोणाचे दुमत नाही, ते लावायलाच पाहिजे. पण फोटो लावताना त्याचे भान असायला पाहिजे. जोगाईवाडी/ चतूरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटोची एक लाईन आहे. त्या फोटोंमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या बाजूला एका माजी मंत्र्यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच एक फोटो सोडून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावण्यात आला आहे. जशीच ही बाब शिवसेनेचे (उबाठा) मदन परदेशी यांच्या लक्षात आली, त्यांनी त्याच वेळी घटनेचा निषेध नोंदवित फोटो हटविण्याची मागणी केली. परंतू, सत्तेच्या धुंदीत असणाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. जशीच ही वार्ता विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना समजली, त्यांनी तातडीने घटनेचा निषेध नोंदवित उपजिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. ‘तो’ फोटो तात्काळ हटविण्यात यावा आणि संबंधित ग्रामसेवकावर आणि या घटनेत दोषी असणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर घटनेचा निषेध
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मधोमध एका माजी मंत्र्यांचा फोटो लावण्यात आला आहे. ही बाब सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. या घटनेचा विविध स्तरांतून निषेध करण्यात आला आहे. फोटो तात्काळ हटविण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मागासवर्गीय संघटनांसह विविध राजकीय पक्षांनी दिला आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात राजकीय नेत्याचा फोटो
अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी/ चतुरवाडी या ग्रूप ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो सोबत स्थानिक राजकीय नेत्याचाही फोटो लावण्यात आला आहे. दरम्यान, शासकीय कार्यालयात फोटो कोणाचा लावावा ? याच्या राज्य सरकारच्या काही महत्वपूर्ण सूचना आहेत. त्या सूचनांना हरताळ फासत बिनधास्तपणे स्थानिक नेत्याचा फोटो लावण्यात आला आहे. तातडीने हे फोटो काढण्यात यावीत, अशी मागणी जनतेकडून करण्यात आली आहे.