आनंदाची बातमी : अखेर मांजरा धरण भरले, दोन दरवाजे उघडले, वाचा… 

टीम AM : बीड जिल्ह्यासह आसपासच्या लातूर, धाराशिव या जिल्ह्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले मांजरा धरण अखेर पुर्ण क्षमतेने भरले आहे. बुधवारी (दि. 25) दुपारी 12.30 वाजता मांजरा धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले असून नदीत 1730 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

पावसाने पाठ फिरवल्याने गेल्या वर्षी मांजरा धरण भरले नाही. त्यामुळे यंदा पुरेसा पाऊस पडणार का ? मांजरा धरण भरणार का ? याकडे तमाम अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले होते. धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली. गेल्या दोन – तीन दिवसात धरणातील जीवंत पाणी साठा 90 टक्क्यांच्या वर पोहचला होता. पावसाने हजेरी लावल्याने धरणात दररोज एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आणि अखेर आज मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले. 

सतर्कतेचा इशारा

बीड जिल्ह्यातील मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्यात येईल, असं पाटबंधारे विभागाचे धनेगाव इथले शाखा अधिकारी सुरज निकम यांनी सांगितलं होतं. त्यानुसार धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. या पार्श्वभूमीवर मांजरा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.