टीम AM : देशभरात यंदा मान्सून चांगलाच बरसला. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सरसरीपेक्षा जास्त पाऊस झाला. हवामान विभागाने मान्सूनसंदर्भात वर्तवलेला अंदाज खरा ठरला. आता मान्सूनने काही राज्यांमध्ये परतीची वाटचाल सुरु केली आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणामधून 24 सप्टेंबर रोजी मान्सून परतला असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी X च्या माध्यमातून दिली.
तसेच आगामी तीन, चार दिवस राज्यात पाऊस असणार आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ तर काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
दरम्यान, अंबाजोगाई शहरासह तालुक्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदी – नाले भरुन तुडुंब वाहत आहेत. काही वेळ पावसाचा जोर थोडा वाढतही आहे. त्यातच पावसामुळे हवेत गारवा वाढला असून नागरिक उबदार कपडयांचा वापर करीत आहेत. अंबाजोगाई शहरासह तालुक्यात पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. शहरातील मंगळवार पेठ भागात पुन्हा एकदा नालीचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे पंचायत समितीच्या समोरील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अंबाजोगाईकरांच्या वतीने करण्यात येत आहे.