टीम AM : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबाजोगाईतील असंख्य तरुण आज रस्त्यावर उतरले. शहरातून मोटारसायकल रॅली काढत तरुणांनी बंदचे आवाहन केले. अंबाजोगाईतील व्यापाऱ्यांनी देखील तरुणांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. दरम्यान, बीड जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 21 सप्टेंबर शनिवार रोजी अंबाजोगाईत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, मागील पाच दिवसांपासून मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. सगे – सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी हे उपोषण सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. अंबाजोगाईतही बंदच्या समर्थनात तरुणांनी एकत्र येत मोटारसायकल रॅली काढत बंदचे आवाहन केले. ही मोटारसायकल रॅली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक – मंडीबाजार – पाटील चौक मार्ग मार्गक्रमण करीत नगरपरिषद परिसरात आली. यावेळी मराठा समाजाच्या युवकांना जोरदार घोषणाबाजी केली. या रॅलीत जरांगे पाटील यांचा फोटो घेऊन असंख्य तरुण सहभागी झाले होते.
उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
मराठा आरक्षणाच्या मागणीचे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासंदर्भाचे निवेदन आज उपजिल्हाधिकारी यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले. निवेदन देताना मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आज सांयकाळी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी असंख्य तरुण रवाना होणार असल्याची माहिती तरुणांनी दिली आहे.