टीम AM : अंबाजोगाई – लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ रविवारी पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्विफ्ट कार मधील चौघेही जागीच ठार झाले. सर्व मयत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील असून त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशीरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कार मधून [एच 24 एएस 6334] औरंगाबादला निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई – लातूर रोडवरील पाचपीर दर्गा जवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची [एमएच 12 एमव्ही 7188] जोरदार धडक झाली. हा अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झाला. यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय ससाणे, पीएसआय यादव, सहा.फौजदार बिडगर, हेड कॉन्स्टेबल शेख, कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे चालकाला समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, लातूरहून अंबाजोगाईकडे येणारा चौपदरी रस्ता बर्दापूरच्या पुढे दुपदरी करण्यात आला आहे. अचानक निमुळता झालेल्या या रस्त्याने आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी घेतले आहे. त्यामुळे हा रस्ता लोखंडी सावरगावपर्यंत चौपदरी करावा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.