दुपदरी रस्ता देतोय मृत्यूला आमंत्रण : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
टीम AM : बीड जिल्ह्यांसह अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले जात असले तरी अंबाजोगाई – लातूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबाजोगाई हद्दीतील दुपदरी रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या काही महिन्यांत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भीषण अपघात झाले असून अनेकांना यात जीव गमवावा लागला आहे. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, त्याच्या झळा अजूनही ते सोसत आहेत. लोकप्रतिनिधींना जनतेच्या जीवांची किंमत थोडी जरी वाटत असली तर त्यांनी हा रस्ता चारपदरी करणं अत्यंत गरजेचं असून त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणे गरजेचे आहे. अंबाजोगाई हद्दीतील हा रस्ता चारपदरी करण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा या भागातील जनतेकडून करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने अनेक जिल्ह्यांच्या सीमांना जोडले आहे. त्यामुळे सहाजिकच राष्ट्रीय महामार्ग याच शहरातून जात आहेत. राज्य सरकारने अगदी काही महिन्यांपूर्वी घोषित केलेला ‘शक्तिपीठ’ महामार्ग देखील अंबाजोगाईतूनच जाणार आहे. एकीकडे शहरात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले जात असताना अंबाजोगाई – लातूर हा राष्ट्रीय महामार्गाचा अंबाजोगाई हद्दीतील रस्ता हा जनतेसाठी डोकेदुखी बनला आहे. त्याचं कारण ही तसेच आहे. अंबाजोगाई हद्दीतील बर्दापूर फाट्यापासून हा रस्ता चारपदरी ऐवजी दुपदरी केला आहे. त्यामुळे याच रस्त्यावर अपघात मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
अंबाजोगाई हद्दीतील बर्दापूर फाट्यापासून ते सायगाव या दरम्यान अपघातांच्या मोठ्या घटना याच रस्त्यावर घडल्या आहेत. गेल्या एक – दिड वर्षात अनेक जणांचा बळी या रस्त्याने घेतला आहे. अपघाताची मालिका ही सुरुच असून काल रात्रीही कार – कनटेनरच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अजून किती दिवस हा रस्ता सामान्य माणसांचे बळी घेणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने पावलं उचलीत पाठपुरावा करणं गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, काल रात्री झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावं हाती आली आहेत. यामध्ये माधव व्यंकटराव खलंग्रे, आत्माराम माधवराव बाणापुरे, सौदागर केशव कांबळे, शंकरराव डोम अशी आहेत. हे चारही जण लातूर जिल्ह्यातील जगलपूर गावाचे रहिवासी असून सोसायटीच्या कामासाठी ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जात होते. रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
चारपदरी रस्त्याचा प्रस्ताव फेटाळला
अंबाजोगाई – लातूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबाजोगाई हद्दीतील चारपदरी रस्त्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग अथोरिटीने फेटाळला आहे. या रस्त्यावर वाहतूक मुबलक प्रमाणात नसल्याचे कारण त्यांनी सांगितले आहे, अशी माहिती आम्हाला सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, अंबाजोगाई हद्दीतील चारपदरी रस्त्याचा प्रस्ताव जरी फेटाळला असला तरी आम्ही नव्याने हा प्रस्ताव सादर करणार असून त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. या संदर्भात विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबत दोन बैठकाही झाल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.