टीम AM : अंबाजोगाई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चनई गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतातील विहीरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, चनई गावात राहणारी कल्याणी कानोबा गोचडे ही मुलगी त्यांच्याच शेतातील विहीरीत गेल्या काही दिवसांपासून पोहणे शिकत होती. रविवारीही ती शेतातील विहीरीत पोहण्यासाठी गेली होती. विहीरीत पोहण्यासाठी उतरली असता काही वेळातच तिला दम लागला आणि पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. मयत कल्याणी ही बालनिकेतन शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होती. कल्याणीचे वडील कानोबा गोचडे हे ‘महावितरण’ मध्ये नोकरीस आहेत. दरम्यान या हृदयद्रावक घटनेमुळे चनई गावात शोककळा पसरली आहे.