स्मारकाचे रखडलेले काम 14 ऑक्टोबरपर्यंत पुर्ण करा : अन्यथा 15 ऑक्टोबर रोजी बंद पाळणार – दिपक केदार यांचा इशारा
टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील मौजे बर्दापूर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे रखडलेले काम 14 ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करा, अन्यथा 15 ऑक्टोबर 2024 रोजी अंबाजोगाई शहर व तालुक्यात बंद पाळण्यात येईल, असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी दिला आहे. तसेच आयोजित बैठकीत केदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे स्मारकाच्या रखडलेल्या कामाबाबत आक्षेप नोंदवून त्यांना धारेवर धरत जाब विचारला. याबाबत उपविभागीय अधिकारी यांना ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने गुरूवारी एक निवेदन देण्यात आले.
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी तालुक्यातील मौजे बर्दापूर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रखडलेल्या स्मारकाच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांची मंगळवार, दिनांक 17 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेट घेतली. रखडलेले काम पुन्हा सुरू करण्याबाबत त्यांनी सांगितले. त्यानंतर बुधवार, दिनांक 18 सप्टेंबर रोजी कार्यकारी अभियंता यांनी स्वतः बर्दापूर स्मारकाला भेट देवून सदर कामाचे कंत्राटदार, स्मारक समिती आणि ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून काम 14 ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करणार, असे आश्वासन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम गेल्या पाच वर्षांपासून अर्धवटच राहिले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्मारकाचे काम सहा महिन्यात पूर्ण करु, असे आश्वासन आंदोलकांना दिले होते. परंतू, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि संबंधित कंत्राटदाराच्या निष्क्रीयेतेमुळे सदरील काम रखडलेले आहे. आश्वासनानुसार वेळेत काम पूर्ण केले नाही तर 15 ऑक्टोबर 2024 रोजी अंबाजोगाई शहर व तालुक्यात बंद पाळण्यात येईल, असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन गायकवाड, मराठवाडा युवक अध्यक्ष अक्षय भुंबे, महिला आघाडी बीड जिल्हाध्यक्षा मिना लोंढे, युवा जिल्हाध्यक्ष नितीन गोदाम, जिल्हा सरचिटणीस विजय कांबळे, तालुकाध्यक्ष बादल तरकसे, युवक तालुकाध्यक्ष शैलेंद्र बनसोडे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा रेखा मस्के, तालुका सचिव प्रकाश गंडले, शहराध्यक्ष भैय्यासाहेब सोनकांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.