बीड जिल्ह्यातील नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, रात्रीतून काही नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता – धनंजय मुंडे यांचे जनतेला आवाहन
टीम AM : संपूर्ण बीड जिल्ह्यात 31 ऑगस्टच्या सांयकाळपासून ते आतापर्यंत सातत्याने सर्व दूर पाऊस पडत असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच जलाशय तुडुंब भरून नदी – नाले खळखळून वाहू लागले आहेत. जिल्ह्यावरील जलसंकट दूर झाल्याची बातमी जरी आनंददायक असली तरी सततच्या पावसाने अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला असून त्यामुळे खरीप हंगामातील शेती पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर काही महसूल मंडळांमध्ये 24 तासांमध्ये अतिवृष्टीच्या निकषांप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला असून, राज्य शासनाच्या महसूल विभागाने यापूर्वीच काढलेल्या आदेशाला अनुसरून महसूल व कृषी विभागाने पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांच्या तसेच घरांच्या पडझडीच्या आदी नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व शेती पिकांच्या 33% च्या मर्यादेपेक्षा जास्त नुकसानीचे अहवाल राज्य शासनाकडे मदतीच्या मागणीसह तातडीने पाठवावेत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात एक रुपयात पिक विमा योजनेत सहभाग घेतला असून आपल्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीच्या नियमानुसार विमा कंपनीला देखील निर्धारित वेळेत कळवावी, जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचेही संरक्षण लागू राहील, असेही आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात
दरम्यान, सध्या जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान मोठे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून त्याउपर नद्यांमधून व नाल्यांमधून पाणी वाहत आहे. पावसाचा जोर आणखी पुढील 24 तास जर इतकाच प्रखर राहिला तर काही नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात व त्यामुळे नदीकाठच्या गावांना किंवा नदीकाठच्या शहर वस्त्यांना देखील याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विशेष करून जलाशय व नदीकाठच्या गावच्या नागरिकांनी सतर्क रहावे. या आवाहनासह नदीच्या पूर नियंत्रण रेषेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचे इतरत्र स्थलांतर करण्यात यावे, अशा पद्धतीच्या सूचना देखील धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.