टीम AM : बीड जिल्ह्यात काल दिवसभर पावसाने सर्वदुर हजेरी लावली असून नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. बिंदुसरा जलप्रकल्पाचा तलाव पूर्णपणे भरला असून, काल याठिकाणी शेतकरी आणि स्थानिकांच्या उपस्थितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. जिल्ह्यातले 143 मध्यम आणि 36 लघू प्रकल्प तुडुंब भरले आहेत. दरम्यान, धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे, अशी माहिती आमच्या प्रतिनिधी कडून प्राप्त झाली आहे.
बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं, नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. परळी – बीड महामार्गावरील पांगरी इथला पर्यायी पूल पाण्याखाली गेल्यानं, या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आपत्कालीन स्थितीत त्वरित मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याचं आवाहन खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. जलाशय आणि नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सावध राहण्याची सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’ जारी
येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आज ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.