टीम AM : कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी मंगळवारपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने जाहीर केले होते. या काळात ‘अत्यावश्यक सेवा’ मात्र सुरू राहतील, अशी माहिती देण्यात आली होती.
‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी देखील कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारपासून आंदोलन सुरू केले आहे. ‘स्वाराती’ परिसरातच ते दररोज विविध माध्यमातून आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधून घेत आहेत. निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. दरम्यान, निवासी डॉक्टरांच्या आंदोलनामुळे ‘स्वाराती’ रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होत आहेत.
अधिष्ठाता डॉ. धपाटे यांनी दिली भेट
कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ ‘स्वाराती’ रुग्णालय परिसरात निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास्थळी अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी आज भेट दिली. कोलकाता येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. आम्ही निवासी डॉक्टरांच्या मागण्यांचे पुर्ण समर्थन करतो. स्थानिक पातळीवर ज्या काही डॉक्टरांच्या मागण्या आहेत, त्या सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे डॉ. धपाटे यांनी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना सांगितले. या आंदोलनात ‘स्वाराती’ ‘मार्ड’ चे अध्यक्ष डॉ. गौरव सिसोदे, उपाध्यक्ष डॉ. तेजस मादकवडे, सचिव डॉ. आदित्य वाघमारे, महिला प्रतिनिधी डॉ. शिवानी कच्चवाह, डॉ. तनुश्री सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.
- काय आहेत मागण्या ?
- केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत कोलकाता निवासी डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
- संपकरी निवासी डॉक्टरांचा पोलिसांनी जाच करू नये.
- तज्ज्ञांची समिती स्थापन करून केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी.
- वसतिगृहाची व्यवस्था करून ड्युटीवरील डॉक्टरांसाठी चांगल्या अद्ययावत खोलीची व्यवस्था करावी.
- रुग्णालय परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवावी, पुरेशा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी.