अंबाजोगाई शहराचे होतय विद्रुपीकरण
टीम AM : अंबाजोगाई शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून अनधिकृत शेकडो बॅनर्स झळकले आहेत. या बॅनर्सचा एक रुपायाही कर नगरपरिषदेला भरला नाही. सदरिल बॅनर लावण्यासाठी कुणी परवानगी दिली ? यावर कुणाचा अंकुश आहे ? अशी चर्चा शहरवासीयांमध्ये होत असून अनधिकृतपणे लावलेले बॅनर्स तात्काळ काढण्याची मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, राज्य शासनाने एक परिपत्रक काढून बॅनर्स लावण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना संबंधित महानगरपालिका, नगरपरिषद यांना केलेल्या आहेत. शहरात जाहिरात करण्यासाठी होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर, पोस्टर, झेंडे आदींसाठी सशुल्क परवानगी दिली जाते. मात्र, अंबाजोगाई शहरात नगरपरिषदेचा परवाना न घेता बॅनरबाजी केली जात आहे. त्यामुळे अंबाजोगाई शहराचे विद्रुपीकरण होत असून नगरपरिषदेचे उत्पन्नही बुडत आहे. त्यामुळे अनधिकृत बॅनरबाजीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अंबाजोगाई शहरात बहुतांश बॅनर्स हे राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणात मुख्य रस्त्यावर अनाधिकृतरित्या लावले आहेत. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने माहिती घेतली असता सदर बॅनरचा कसल्याही प्रकारचा कर नगरपरिषदेला भरला नसल्याचे सांगण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासनाने अनाधिकृत बॅनरवर लक्ष केंद्रित करुन शहराचे होणारे विद्रुपीकरण थांबवावे आणि संबधितांकडून कर वसूल करावा अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे.
मुख्याधिकारी यांनी दिले आदेश
अंबाजोगाई शहरात गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेला कुठलाही कर न भरता बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. यात बहुतांश राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आघाडीवर आहेत. अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावर अनधिकृत लावलेल्या बॅनर्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. आमच्या प्रतिनिधीला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी सांगितले की, शहरातील अनधिकृत बॅनर्स हटविण्याबाबत सक्त आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.