टीम AM : हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या बर्थडेची तारीख खास असली तरी, वर्षही खूपच खास आहे. 15 ऑगस्ट 1947 …ज्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला, त्याच दिवशी त्यांचा जन्म झाला. पश्चिम बंगाल इथल्या रानाघाटमध्ये जन्मलेल्या राखी यांच्या फिल्मी करिअरसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा झाली. सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या राखी यांनी आयुष्यात बराच संघर्ष केला.
राखी यांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी अजय विश्वास यांच्यासोबत लग्न केलं होतं. ते एक पत्रकार आणि सिनेदिग्दर्शक होते. पण दोन वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी घटस्फोट घेणं सोपी गोष्ट नव्हती. पण यातून बाहेर पडून राखी यांनी करिअरवर लक्ष दिलं.
1967 मध्ये आलेल्या ‘बोधु बोरॉन’ या सिनेमातून राखी यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर राखी यांनी राजश्री प्रोडक्शनच्या ‘जीवन-मृत्यु’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या सिनेमात त्यांच्यासोबत धर्मेंद्र होते. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान, राखी यांची ओळख लोकप्रिय गीतकार गुलजार यांच्यासोबत ओळख झाली. 1973 मध्ये राखी आणि गुलजार यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगीही झाली. तिचं नाव मेघना.
आयुष्यात चढ – उतार येऊ लागले. गुलजार यांनी राखी यांच्यासमोर सिनेमात काम करता येणार नाही, अशी अट ठेवली होती. पण राखी यांना करिअर थांबवायचं नव्हतं. मुलीच्या जन्मानंतर त्या इंडस्ट्रीत पुन्हा काम करण्यासाठी इच्छूक होत्या. पण गुलजार यांना हे पटत नव्हतं. एका सिनेमाच्या शूटिंगसाठी राखी कश्मीर इथं होत्या, सोबत गुलजारही आले होते. पण इथंच त्यांच्यात एक मोठा वाद झाला होता. गुलजार यांनी राखी यांच्यावर हात उगारला होता. यानंतर दोघांच्या नात्यात आणखी दुरावा आला.
हा किस्सा आहे ‘आंधी’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा. काही रिपोर्ट्सनुसार या सिनेमाच्या अभिनेत्री सुचित्रा सेन अभिनेता संजीव कुमारवर नाराज होत्या. यावेळी गुलजार सुचित्रा सेन यांची समजूत काढण्यासाठी गेले होते. एका बंद खोलीत दोघांमध्ये बोलणं सुरू होतं. राखी यांनी गुलजार यांना सुचित्रा यांच्या रुममधून बाहेर पडताना पाहिलं. दोघांमध्ये मोठं भांडणं झालं. यानंतर दोघांनी एकमेकांसोबत न राहण्याचा निर्णय घेतला. मिडिया रिपोर्टनुसार 2020 मध्ये राखी आणि गुलजार त्यांच्या कुटुंबियांसोबत होळी साजरी करताना दिसले. समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये त्यांना ओळखणे कठीण होते.