केज विधानसभा निवडणुक लढविणार : ‘बहुजन विकास मोर्चा’ चे अध्यक्ष बाबुराव पोटभरे
अंबाजोगाईत पत्रकार परिषद : ज्वलंत विषयावर वेधले लक्ष
टीम AM : राजकारणच केले असते तर केज विधानसभा मतदारसंघाचा प्रदीर्घ काळ आमदार राहिलो असतो, असे सांगत केज विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार आहोत, अशी माहिती ‘बहुजन विकास मोर्चा’ चे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी अंबाजोगाईत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयावर आपले मत व्यक्त केले. तसेच ज्वलंत विषयावर लक्षही वेधले.
मागील काही दिवसांपासून अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या केज विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे हे आगामी 2024 ची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत होती. त्या पार्श्वभूमीवर पोटभरे यांनी केज मतदारसंघातील अनेक गावांना भेटी दिल्या आहेत. तसेच प्रमुख नेत्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या आणि विविध समाज घटकांच्या गाठी – भेटी घेऊन त्यांच्या सोबत चर्चा सुरू केली आहे, हे त्यांच्या अंबाजोगाई येथे शनिवार, दि.10 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिसून आले. पोटभरे हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजे राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची विचारधारा जोपासणारे पुरोगामी चळवळीतील निष्ठावंत नेते आहेत. तशी त्यांची राज्यभर ओळख आहे. आपल्या आक्रमक भूमिकेसाठी ते कायमच ओळखले जातात. अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यासह बीड जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय परिस्थितीवर नेमके भाष्य केले. राज्यातील अस्थिरतेबद्दल चिंता ही व्यक्त केली. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सामाजिक तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आरक्षणाच्या विषयावर सुरू असलेल्या वेगवेगळ्या टिपण्णी आधी बंद झाल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
आम्ही आमच्या ताकदीवर टिकून आहोत
बीड हा क्रांतीसिंह नानासाहेब पाटील ते दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्यापर्यंत पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. सध्याचे जातीयवादी वातावरण जिल्ह्यासाठी व पुढील पिढ्यांसाठी पोषक नाही. आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या भूमिकेचे फार पुर्वीपासून समर्थन करीत आहोत. त्यामुळे राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करीत असल्यामुळे राजकारणात आम्ही आमच्या ताकदीवर टिकून आहोत. बीड जिल्ह्यात राजकीय दृष्ट्याही आम्ही स्पर्धेत आहोत. विधानसभा निवडणुक लढविण्याची आमची तयारी आहे. बीड जिल्ह्यातील जातीयवाद व द्वेष संपविणे, टक्केवारीचे राजकारण थांबवायचे आहे. श्रीमंत – गरीबातील आर्थिक दरी मिटवायची आहे. त्यामुळे आम्ही डंके की चोट पर येणार आहोत.
मागासवर्गीय, बहुजन समाजाला म्हणावा तसा न्याय दिला नाही
‘बहुजन विकास मोर्चा’ ही सामाजिक संघटना आहे. जर मी राजकारणच केले असते तर केज विधानसभा मतदारसंघाचा प्रदीर्घ काळ आमदार राहिलो असतो, असे सांगून पोटभरे पुढे म्हणाले की, केज विधानसभा मतदारसंघातून ज्यांना लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली, त्यांनी मागासवर्गीय व बहुजन समाजाला म्हणावा तसा न्याय दिला नाही. आम्ही केज व माजलगाव या दोन विधानसभा मतदारसंघावर दावा करीत आहोत. केज विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, अंबाजोगाई जिल्हा करण्यासाठी मी स्वतः केज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. मी कुठल्याही चिन्हावर निवडणूक लढवू शकतो. ज्यांनी आम्हाला यापूर्वी धोके दिले त्यांना आगामी निवडणुकीत पाडणार आहोत, असा गर्भित इशारा ‘बहुजन विकास मोर्चा’ चे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी बीड जिल्ह्यातील नेत्यांचे नांव न घेता दिला आहे.
पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांचे आभार बहुजन विकास मोर्चाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष विनोद शिंदे यांनी मानले. तर या पत्रकार परिषदेस माजलगाव बाजार समितीचे उपाध्यक्ष श्रीहरी नाना मोरे, भीमराव अप्पा टाकणकर, नवनाथ अण्णा धायजे, लखन हजारे, विक्की कोमटवार, अविनाश कुऱ्हाडे, विशाल पोटभरे, बाबा शेख, बालाजी मिसाळ, सुरज ताटे, धीरज वाघमारे, सूरज शिंदे, अतिष मंजुळे, रवी आवाडे, शरद पवार, अजय जोगदंड, गौतम शिनगारे, लखन चव्हाण, गोकुळ इचके, दीपक मिसाळ, समाधान मिसाळ यांच्यासह बहुजन विकास मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.