टीम AM : अंबाजोगाई शहरासह परिसरात रस्ते जरी चकाचक होत असले तरी अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेपवाडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्याची पत्नी गंभीर जखमी असल्याने लातूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अपघाताची ही घटना दिनांक 10 ऑगस्ट शनिवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर परिसरात राहणारे दाम्पत्य अहमद शफी सय्यद व पत्नी रईसा अहमद हे धायगुडा पिंपळा या ठिकाणी मुलीला भेटण्यासाठी दुचाकीवर गेले होते. मुलीची भेट घेऊन ते अंबाजोगाईकडे दुचाकीवर येत होते. शेपवाडी जवळ ते आले असता अज्ञात वाहनानी त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दोघेही पती – पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, उपचारादरम्यान अहमद शफी सय्यद यांचा आज मृत्यू झाला तर पत्नी रईसा अहमद या खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
दरम्यान, आज अहमद शफी सय्यद यांचा दफनविधी करण्यात आला. या घटनेमुळे क्रांतीनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.