वैद्यकिय महाविद्यालयाच्या मागणीला आरोग्यमंत्री नड्डांकडून होकार : खा. बजरंग सोनवणेंनी भेट घेवून केली सविस्तर चर्चा

टीम AM : बीडसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, अशी मागणी खा. बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांची भेट घेवून केली. यावेळी नड्डा यांनी सदरील मागणीचे पत्र वाचून लवकरच याबाबत निर्णय घेवू, असा होकारही दिला. यावेळी खा. सोनवणे यांनी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या दृष्टीने सविस्तर चर्चाही केली.

[Advt.]

दि.9 ऑगस्ट रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांची बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली. यावेळी नड्डा यांनी बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागासंबधित असलेल्या अडचणींबाबत जाणून घेतले. यावेळी बीडच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बीडला झालेच पाहिजे, असा आग्रह खा. सोनवणेंनी धरला. शिवाय बीड जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, अशा स्थितीत मेडिकलच्या विद्यार्थ्यांचेही भवितव्य अंधारात आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्याला मायबाप शासनाने हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून द्यावे. जिल्ह्याला कुठलीही कमतरता भासणार नाही, असे सांगत जिल्हाभरातील आरोग्यव्यवस्था व इतर बाबींवर त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अडचणींवर लवकरच प्रभावी निर्णय घेऊन उपाय करू, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात देखील शासन गांभीर्यपूर्वक विचार करेल, असा विश्वास मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी दिला. लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर खा. सोनवणे यांनी जिल्हाभर हार – तुरे करत बसण्यापेक्षा कामाला महत्व दिले असून जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले आरोग्य विभागातील प्रश्न ते मांडत आहेत. या निमीत्ताने जिल्हा आरोग्य यंत्रणेत बदल होईल, असे दिसत आहे.