टीम AM : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या दोन्ही हप्त्याची रक्कम 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘जनसन्मान’ यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. त्या निमित्तानं नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं, जाहीर सभेत ते बोलत होते. या वर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी, तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना सरकारने आणल्या असल्याचं अजित पवार यांनी म्हटले आहे.
6 हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी उशीर होत आहे. पण महिलांना त्यांचा हक्क मिळेल. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. आमचा प्रयत्न आहे की, 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करावेत. आतापर्यंत सव्वा कोटी महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, 17 तारखेपर्यंत हा आकडा दीड ते दोन कोटींवर जाईल. कालच मी 6 हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आलोय. ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या पैशातून तुमच्या स्वत:साठी काहीतरी घ्या. लाडक्या बहिणींनी पैसे खर्च केल्यास बाजारपेठेला उठाव मिळेल, असा दावा अजित पवार यांनी केला.