टीम AM : केज मतदारसंघात आतापर्यंत अनेक निवडणूका झाल्या. मात्र, राखीव मतदारसंघ असून देखील एका विशिष्ट जातीतील व्यक्तिलाच सातत्याने संधी मिळत गेली आहे. मतदारसंघात अनुसूचित जाती – जमातीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात बौद्ध समाजाची संख्या अधिक असल्याने निवडणूकीत राजकीय पक्षांनी बौद्ध समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी जेष्ठ नेते ॲड. अनंतराव जगतकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.
अंबाजोगाई शहरातील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे जेष्ठ नेते वसंत मोरे, तालुकाध्यक्ष असिफोद्दीन खतीब यांची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना जगतकर म्हणाले की, केज मतदारसंघात आतापर्यंत चर्मकार समाजाचेच उमेदवार निवडून आले आहेत. माजी आमदार स्वामी आणि माजी आमदार साठे यांचा कालावधी सोडला तर अनेकदा चर्मकार समाजातील उमेदवारालाच संधी मिळाली आहे. आतापर्यंत बौद्ध समाजातील एकही व्यक्ती आमदार झाला नाही. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी चंद्रशेखर वडमारे यांना संधी दिली होती. परंतू, त्यानंतर आजतागायत एकाही राजकीय पक्षाने बौद्ध उमेदवाराबाबत सकारात्मक विचार केला नाही. केज मतदारसंघ हा राखीव मधून राखीव आहे का ? असा प्रश्न उपस्थित करीत बौद्ध समाजातील उमेदवाराला संधी देण्यात यावी, अशी मागणी जगतकर यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार
महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिल्यास केज मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे जगतकर यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या खूप अपेक्षा असतात. केज मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. ग्रामीण भागातील जनतेला विकासाभिमुख चेहरा हवाय, जो जनतेला न्याय मिळवून देईल. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असे जगतकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.