‘शोले’ : ‘गब्बर’ साठी अमजद खान नव्हते पहिली पसंती, मग कशी मिळाली भूमिका ? वाचा… 

टीम AM : आपल्या दमदार अभिनयाने ‘शोले’ मधील ‘गब्बर’ ची भूमिका गाजवणारे अभिनेते अमजद खान यांचा आज (12 नोव्हेंबर) जन्मदिन आहे. बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ चित्रपटाचे नाव अग्रक्रमी आहे. एका रात्रीत हिंदी चित्रपटसृष्टीचे नशीब बदलून टाकणारा चित्रपट आजही तितक्याच आवडीने पहिला जातो. खासकरून ‘शोले’ मधील ‘गब्बर सिंग’ च्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली. दिवंगत अभिनेते अमजद खान यांनी गब्बरची भूमिका खूप छान साकारली होती. पण, अमजद यांच्या आधी ‘शोले’ चित्रपटात गब्बरची भूमिका आणखी एका अभिनेत्याला ऑफर झाली होती.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर आणि सलिम खान यांनी ‘शोले’ चित्रपट लिहिला होता. हा मल्टीस्टारर चित्रपट बनवायला खूप वेळ लागला. त्यामागील मुख्य कारण म्हणजे चित्रपटाची स्टारकास्ट निवड. कारण, जर ‘शोले’ चित्रपट पाहिला असेल तर लक्षात येतं की, या चित्रपटातील प्रत्येक पात्राची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. या चित्रपटातील सगळ्याच भूमिका खूप गाजल्या. परंतू, अमजद खान यांनी साकारलेली ‘गब्बर सिंग’ ही व्यक्तिरेखा विशेष गाजली.

रिपोर्ट्सनुसार, अमजद खानच्या आधी ‘शोले’ मध्ये गब्बर सिंहची भूमिका बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता डॅनी डेन्झोंगपा यांना ऑफर करण्यात आली होती. कारण, ‘शोले’ त डॅनी यांनी काम करावे अशी लेखक जावेद अख्तर यांची इच्छा होती. पण, काही कारणास्तव डॅनी यांनी ‘शोले’ ची ही ऑफर नाकारली आणि नंतर गब्बर सिंगची भूमिका अमजद खान यांच्याकडे गेली. ही भूमिका साकारून अमजद खान यांनी इंडस्ट्रीतील नकारात्मक भूमिकेची व्याख्याच बदलून टाकली.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र, संजीव कुमार, मेगास्टार अमिताभ बच्चन, सत्येन कप्पू, सचिन, असरानी, अमजद खान, अभिनेत्री जया बच्चन आणि हेमा मालिनी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी ‘शोले’ या मल्टीस्टारर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या सर्वांच्या अप्रतिम अभिनयामुळे ‘शोले’ हा इंडस्ट्रीचा सदाबहार चित्रपट ठरू शकला आहे.