‘बाबू’ मधील ‘फ्युचर बायको’ धमाल गाणं प्रदर्शित 

टीम AM : श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटातील एक नवीन गाणे  भेटीला आले आहे. ‘फ्युचर बायको’ असे या गाण्याचे बोल असून या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा दमदार आवाज लाभला आहे. मनातील प्रेमभावना प्रेयसीसमोर व्यक्त करणाऱ्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले असून ऋषिकेश कामेरकर यांचे या धमाल गाण्याला संगीत लाभले आहे. 

अंकित मोहन आणि रुचिरा जाधव यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यात बाबू शेठची जगावेगळी प्रपोज करण्याची स्टाईल आणि सुप्रियाचे नखरे दिसत आहेत. आगरी भाषेतील गोडवा आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत या गाण्यात दिसत आहे. ‘फ्युचर बायको’ हे गाणे प्रेमात असणाऱ्या प्रत्येकाचे मन घायाळ करेल असेच आहे. 90 च्या शतकातील ‘बाबू शेठ’ च्या आयुष्याची ही कथा आहे. ‘बाबू’ चा बाबूशेठ कसा होतो, हे जाणून घ्यायचे असल्यास हा चित्रपट बघावा लागेल.  

दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ‘या गाण्याची संगीत टीम अतिशय कमाल आहे. त्यामुळे हे गाणे अधिकच जबरदस्त झाले आहे. नव्वदच्या दशकातील प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण करून देणारे हे गाणे आहे. हे गाणे ऐकायला जितके मजेदार आहे तितकीच गंमत ते पाहाण्यातही आहे. मला खात्री आहे, आताच्या पिढीलाही हे गाणे तितकेच आवडेल. आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी हे गाणे बेस्ट आहे.’ सुनीता बाबू भोईर यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात अंकित मोहन, रुचिरा जाधव, नेहा महाजन, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव, मंदार मांडवकर, पूनम पाटील आणि राजेंद्र जाधव यांच्या भूमिका आहेत. मयूर मधुकर शिंदे यांनी दिग्दर्शनासहित लेखनाची धुरा सांभाळली आहे