टीम AM : अंबाजोगाईत पावसाने गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. सतत रिमझीम पावसामुळे गेल्या दोन – तीन दिवसापांसून ढगाळ वातावरण असून सूर्यदर्शन झालेच नाही. अंबाजोगाईत आतापर्यंत 448.4 मिलीमिटर पाऊस पडला असून, बुधवारी संपूर्ण दिवसभर संततधार होती. त्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली तर जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अंबाजोगाईत 19 जुलैपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या सरी कमी – अधिक प्रमाणात सुरूच आहेत. अंबाजोगाईत आतापर्यंत 448.4 मिलीमिटर पाऊस पडला असून तालुक्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अंबाजोगाई शहरासह तालुक्यात गेल्या दोन – तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवरील रोगराईला आमंत्रण देत आहे. गेल्या दोन दिवसांंपासून अंबाजोगाईत संततधार पाऊस सुरू आहे. काही वेळ पावसाचा जोर थोडा वाढतही आहे. त्यातच पावसामुळे हवेत गारवा वाढला असून नागरिक उबदार कपडयांचा वापर करीत आहेत. अंबाजोगाई शहरासह तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. विशेषत: सखल भागात पाणी साचल्याने तेथून नागरिकांना चालताना कसरत करावी लागत आहे.
काळवटी साठवण तलाव ‘ओव्हरफ्लो’
अंबाजोगाई शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी – नाले भरून तुडुंब वाहत आहेत. अशातच अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणारा काळवटी साठवण तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात पाण्याचा ओघ सुरू असून आज पाणी मृतसाठ्याच्या वर आले आहे, अशी माहिती मिळाली आहे.