टीम AM : बीड जिल्ह्यातील पालवन गावात दलितांना स्मशानभूमी नाही, या गोष्टीची चर्चा संबंध राज्यभर होत असताना अंबाजोगाई तालुक्यातही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. धानोरा [खुर्द] गावात अजूनही दलितांना स्मशानभूमी नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात अक्षरशः चिखल तुडवीत उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ या दलित बांधवांवर आली आहे. केज मतदारसंघ राखीव असूनही दलित बांधवांसाठी साधी स्मशानभूमी मिळत नाही तर त्या राखीव मतदारसंघाचा काय उपयोग ? असा सवाल दलित बांधवांकडून उपस्थित होत आहे. अंबाजोगाई तालुका प्रशासनाने तातडीने दलित बांधवांच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
केज मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यात धानोरा [खुर्द] हे गाव आहे. या गावात दलित बांधवांची संख्या अत्यल्प असल्याने त्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून या गावात दलित बांधवांसाठी साधी स्मशानभूमी उभारण्यात आली नाही. स्मशानभूमी नसल्याने त्यांना उघड्यावरचं अंत्यविधी करावा लागतो. पावसाळ्यात एखादी दुःखद घटना घडली तर अंत्यविधी करतांना दलित बांधवांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. चिखलातून वाट काढीत त्यांना अंत्यविधीसाठी जावं लागतं. त्यातचं पाऊस जर थांबतचं नसला तर अंत्यविधी करण्यासाठी ताटकळत बसण्याची वेळ त्यांच्यावर येते. दलित बांधवांसाठी स्मशानभूमी उभारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने केली. परंतू, त्यांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले.
राखीव मतदारसंघाचा काय उपयोग ?
केज मतदारसंघ हा गेल्या कित्येक वर्षांपासून राखीव मतदारसंघ आहे. राखीव मतदारसंघ असला तरी दलित बांधवांचे मुलभूत प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. दलित बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी राखीव मतदारसंघाची रचना करण्यात आली. परंतू, दलित बांधवांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत स्वतःचाच विकास करण्याची भूमिका येथील लोकप्रतिनिधींनी घेतली. त्यामुळे राखीव मतदारसंघाचा दलित बांधवांसाठी काय उपयोग ? असा सवाल दलित बांधवांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा
धानोरा [खुर्द] गावात दलित बांधवांसाठी स्मशानभूमी नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दलित बांधवांच्या स्मशानभूमीच्या प्रश्नांकडे अंबाजोगाई तालुका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे. अंबाजोगाई तालुका प्रशासन तातडीने स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावलं उचलतील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.