टीम AM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यामातून तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये सहा महिन्यांसाठी मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच सरकारकडून पात्र तरुणांना दर महिन्याला 6 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन मिळणार आहे. या योजनेचा लाभ नेमकं कोणत्या तरुणांना मिळणार नाही याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही योजना तीन भागात विभागली गेली आहे. या योजनेतून 12 वी उत्तीर्ण तरुणांना महिन्याला 6 हजार रुपये विद्यावेतन मिळेल. तर आय.टी.आय तथा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना महिन्याला 8 हजार रुपये विद्यावेतन आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे.
‘या’ तरुणांना लाभ होणार नाही
- या योजनेचा 18 पेक्षा कमी वयाच्या तरुणांना आणि 35 पेक्षा जास्त वय असणाऱ्या तरुणांना लाभ मिळणार नाही.
- शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- सरकारी तसेच खासगी ठिकाणी काम करत असणाऱ्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- केवळ बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- 12 वी उत्तीर्ण नसलेल्या किंवा त्यापेक्षा कमी शिक्षण असलेल्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ज्या तरुणांचं बँक खातं आधार कार्डला जोडलेलं नसेल त्यांना या योजनेपासून मुकावं लागू शकतं.
- जे तरुण मूळचे महाराष्ट्राचे नाहीत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या तरुणांना कागदपत्रांची पूर्तता करता येणार नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
विद्या वेतनास पात्र राहणार नाहीत ‘हे’ तरुण
- या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर, सबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही.
- प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्तता केली असली परंतू सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही.
- या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारी (NAPS /MAPS) पूर्ण केलेले आणि करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत.
- एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.
ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
तरुणांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. महाराष्ट्र सरकारची लाडका भाऊ योजनेसाठी अधिकृत वेबसाईट असेल. तिथे होम पेज उघडल्यानंतर New User Registration या बटनावर क्लिक करावं लागेल. तिथे क्लिक केल्यानंतर लगेच पुढे अर्ज ओपन होईल. या अर्जात विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वकपणे भरावी लागेल. यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमीट बटनवर क्लिक करावं लागेल. अशा माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.