‘हे चांदणे फुलांनी’ गाण्यातील मुलगी आठवतेय का ? ती सध्या काय करते… वाचा… 

टीम AM : ‘हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली…’ या लोकप्रिय गाण्यातील मराठी मुलगी आता काय करते ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.. 1982 सालच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते कमलाकर तोरणे यांनी तर आशालता वाबगावकर, आशा काळे, रविंद्र महाजनी, मधुकर तोरडमल, महेश कोठारे, अरुण सरनाईक, उषा नाईक, तृप्ती अशा अनेक मातब्बर कलाकारांनी ‘चांदणे शिंपित जा’ हा चित्रपट आपल्या अभिनयाने चांगलाच गाजवला होता. चित्रपटातील ‘हे चांदणे’ गाणं चित्रित झालं होतं ‘तृप्ती’ या अभिनेत्रीवर.

अभिनेत्री तृप्ती हिचे पूर्ण नाव आहे ‘तृप्ती नाडकर’. 2 जानेवारी 1969 रोजी दार्जिलिंग येथे तिचा जन्म झाला. मूळचे मुंबईला स्थायिक असलेले तृप्तीचे वडील कामानिमित्त दार्जिलिंगला रवाना झाले आणि तिथेच मायादेवी नावाच्या एका गायिकेसोबत त्यांची ओळख झाली, त्यानंतर दोघांनी लग्नही केले. तृप्ती ही त्यांची एकुलती एक मुलगी. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासूनच तृप्तीने एक बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. 

‘चांदणे शिंपित जा’, ‘घरचा भेदी’ अशा मराठी चित्रपटात तिला अभिनयाची संधी मिळाली. ‘कुसुमे रुमाल’ या चित्रपटावेळी तिचे लग्न ठरले होते. दरम्यान, मुंबई स्थित इम्पोर्ट – एक्स्पोर्टचा बिजनेस असलेल्या व्यक्तीशी तिने लग्नही केले. दोन मुलांच्या जन्मानंतर तिने स्वतःचा डान्स क्लास सुरू केला.

तृप्तीचा थोरला मुलगा हा मुंबईतील तिने सुरू केलेला ‘तृप्तीज् डान्स क्लास’ चालवत आहे. तर तिचा धाकटा मुलगा जाहिरात आणि टीव्ही मालिका क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयातून ब्रेक घेतलेल्या तृप्तीने अनेक वर्षांनी ‘आमको काख’ या चित्रपटात पुनरागमन केले. ‘कुसुमे रुमाल 2’, ‘कोही मेरो’ असे आणखी काही चित्रपट तिने साकारले. आज एक नेपाळी अभिनेत्री म्हणून परिचयाची असलेली तृप्ती कधीकाळी मराठी चित्रपटातही गाजली हे एक मराठी प्रेक्षक कदापिही विसरू शकणार नाहीत. तिच्यावर चित्रित झालेलं ‘हे चांदणे फुलांनी …’ हे गाणं तर आजही तितकेच लोकप्रिय आहे आणि कायम  राहणार.