टीम AM : टी – 20 वर्ल्ड कपमध्ये भारताने ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर देशभरात उत्सव साजरा होत आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 7 धावांनी मात देत भारताने वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. तब्बल 17 वर्षांनी भारताने टी – 20 वर्ल्डकप जिंकल्याने सामान्य जनतेपासून सेलिब्रेटींनाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सर्वच जण आपापल्या परीने जल्लोष करत आहेत. रवीना टंडन, कार्तिक आर्यन, विवेक ओबेरॉय, अनिल कपूर, अमिताभ बच्चन आदी दिग्गज बॉलीवूड कलाकारांनी सोशल मीडियावर भारतीय संघाला शुभेच्छा देत आनंद साजरा केला.
रवीनाने शेअर केला डान्सचा व्हिडिओ
टीम इंडिया जिंकल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने आपल्या मुलीसोबत देशभक्तीपर गाणी म्हणत डान्स केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ रवीनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. सोबतच टीम इंडियाला भरभरुन शुभेच्छाही दिल्या आहेत. ‘शानदार टीम इंडिया. खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहित नाही तुम्ही देशाला किती आनंद दिला आहे. काय विजय आहे. भारत माता की जय’, असे कॅप्शन लिहित रवीनाने टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
मन जिंकलंत : कार्तिक आर्यन
अभिनेता कार्तिक आर्यन याने सोशल मीडियावर पोस्ट करत टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. ‘टीम इंडियाने शेवटपर्यंत हार मानली नाही. वर्ल्ड कप नाही मन जिंकलंत तुम्ही. टीम इंडिया, ऐतिहासिक विजय’, असे लिहित कार्तिक आर्यनने शुभेच्छा देत टीम इंडियाचे कौतुकही केले आहे.
हा तर इमोशनल अत्याचार : विवेक ओबेरॉय
भारताने टी – 20 वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद व्यक्त करत अभिनेता विवेक ओबेरॉय याने विराट कोहलीच्या रिटायरमेंटवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच विराट कोहलीने टी – 20 वर्ल्डकपमधून रिटायरमेंटची घोषणा केली. एकाच वेळी विजय आणि पराजय झाल्याची भावना येतेय. टीम इंडियामध्ये आम्ही तुला मिस करू सुपरहिरो’, असे विवेकने लिहिले आहे.
अनिल कपूरनेही दिल्या शुभेच्छा
ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्व भारतीय नागरिक आता सारखीच भावना व्यक्त करत आहेत, खरे चॅम्पियन.’
डोळ्यात पाणी आलं : अमिताभ बच्चन
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही सोशल मीडियावर शुभेच्छा देत म्हटले की, ‘वर्ल्ड चॅम्पियन्स डोळ्यात पाणी आले. भारत माता की जय, जय हिंद जय हिंद जय हिंद.’