पंकजा मुंडे आमदार होणार : विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

टीम AM : भाजपानं विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडेंसह परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. 

माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर सातत्यानं त्यांचं राजकीय पूनर्वसन करण्यात यावं, अशी मागणी पंकजा समर्थकांकडून करण्यात येत होती. यावर्षी झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत पंकजा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी पराभव केला होता. या पराभवानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले होते. 

पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने काही जणांनी आत्महत्या देखील केल्या होत्या. बीड जिल्ह्यातील काही गावांनी पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केले नाही तर भाजपला मतदान न करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे भाजपच्या कोअर कमिटीने याची गंभीर दखल घेत पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे.