पाण्याच्या भोवऱ्यात बोट उलटली : सहा जणांचा मृत्यू

टीम AM : अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत बचाव कार्य सुरु असताना राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील तीन जवान, दोन तरुण आणि एक स्थानिक नागरिकांसह सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. काल प्रवरा नदीत दोन मुलं बुडाल्यानंतर त्यांचा शोध आणि बचाव कार्याची मोहीम सुरु असताना ही घटना घडली. 

जवान कर्तव्यावर असताना पाण्याच्या भोवऱ्यात बोट अडकून उलटल्यानं ही दुर्घटना घडली. यात धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, राहुल गोपिंचंद पावरा आणि वैभव सुनिल वाघ यांचा समावेश आहे. मृत जवानांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे धुळे इथं श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

उजनी जलाशयात 46 तासांनी मृतदेह सापडले

उजनी जलाशयात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील सर्व सहा मृतदेह आज राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या हाती लागले आहेत. तीन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा मृतात समावेश आहे. गेल्या 21 तारखेला ही दुर्घटना घडली होती. दोन दिवसांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांची या जलाशयात शोधमोहीम सुरु होती. दुर्घटनेनंतर 46 तासांनी हे मृतदेह सापडले.