हृदयद्रावक : दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आईची आत्महत्या

टीम AM : अंजनपूर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आईने आत्महत्या केल्याची घटना दि. 21 मे रोजी सायंकाळी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. द्रोपदी संतोष गोईनवाड [वय – 30] मुलगी पूजा गोईनवाड [वय – 7] मुलगा सुदर्शन गोईनवाड [वय – 4] अशी मयतांची नावे असून गडगा ता. नायगाव जि. नांदेड येथील ते रहिवासी आहेत. उपजिविका भागवण्यासाठी हे कुटुंब अंजनपूर येथे 8 महिण्यापासून राहत होते.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, संतोष गोईनवाड याचं द्रौपदीशी लग्न होऊन 9 वर्षे झाली होती. त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती. उदरनिर्वाहासाठी ते अंजनपुर येथे अमोल शितोळे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होते. दुसऱ्याच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी संतोष गेला होता. घरी आल्यानंतर त्याला मुलं आणि बायको दिसली नसल्यामुळे संतोष आणि गावकऱ्यांनी शोध घेतला असता पत्नी आणि मुलांचा मृतदेह विहिरीत असल्याचा संशय आला. विहिरीतील पाणी उपसा करून पाहिले असता द्रोपदीसह दोन मुलांचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पीएसआय चनशेट्टी हे करित आहेत.