पहिल्याच नजरेत प्रेम, लग्नासाठी ओलांडल्या धर्माच्या भिंती, अशी होती पंकज उधास यांची ‘लव्हस्टोरी’

टीम AM : चिट्ठी आई है आई है… या गाण्याने देश – विदेशातील भारतीयांच्या डोळ्यात पाणी आणणारे प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचा आज जन्मदिवस आहे. 17 मे 1951 रोजी त्यांचा गुजरातच्या जेतपूरमध्ये जन्म झाला होता. पंकज उधास हे त्यांच्या गझलसाठी प्रसिद्ध होते. त्यांची ‘लव्हस्टोरी’ सुद्धा तितकीच प्रसिद्ध होती. पंकज उधास यांचा शेजारी राहणाऱ्याच फरीदा यांच्यावर जीव जडला होता. त्यांच्याशी लग्नासाठी त्यांनी धर्माच्या भिंतीही ओलांडल्या होत्या.

पंकज उधास हे ग्रॅज्युएशन करत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी एअर होस्टेस असणाऱ्या फरीदा यांची भेट झाली. पहिल्याच नजरेत ते फरीदा यांच्या प्रेमात पडले. एका शेजाऱ्यानेच दोघांची भेट घडवून आणली आणि पुढे भेटीगाठी वाढत गेल्या. पंकज आणि फरीदा यांच्या प्रेमाबद्दल जेव्हा घरच्यांना समजलं तेव्हा पंकज यांचे कुटुंबिय लग्नाला तयार झाले. पण फरीदा यांच्या कुटुंबियांचा मात्र नकार होता. फरीदा पारसी होत्या आणि त्यांचे कुटुंबिय इतर धर्मात लग्नासाठी तयार नव्हते.

फरीदा यांचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी होते. पंकज यांना भेटण्यासाठी वडील तयार नव्हते. फरीदा यांनी बरेच प्रयत्न करून वडिलांची पंकज यांच्याशी भेट घडवून आणली. पंकज यांना फरीदा यांच्या वडिलांनी म्हटलं होतं की, तुम्हाला जर तुम्ही एकमेकांसोबत आनंदाने राहू शकता असं वाटतं तर लग्न करा.

पंकज उधास हे त्यांच्या तीन भावांमध्ये सर्वात धाकटे होते. त्यांचे दोन्ही भाऊ मनहर उधास आणि निर्मल उधास हे संगीत क्षेत्रात होते. पंकज यांनाही संगीताची आवड होती. गझल गायकीमध्ये त्यांनी आपलं नशीब अजमावलं. 1980 च्या दशकात त्यांचा पहिला अल्बम ‘आहट’ लाँच झाला होता. यानंतर त्यांना बॉलिवूडमधून गाण्याच्या ऑफर्स मिळाल्या. ‘चिठ्ठी आई है’, ‘ना कजरे की धार’, ‘जिए तो जिए कैसे’, ‘घुंगरू टूट गये तो क्या’, ‘जिंदगी से उलझ के’ यासह त्यांच्या अनेक गझल्स प्रसिद्ध आहेत. पंकज उधास यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं. प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना अभिवादन.