टीम AM : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या आणि फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या दुचाकीस्वारांना पोलीसांनी चांगलाच दणका देत कारवाई केली आहे. पोलिसांनी अशा दुचाकीस्वारांकडून 10 बुलेटचे सायलेन्सर आणि 25 फॅन्सी नंबर प्लेट जप्त केल्या आहेत. पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केली.
अंबाजोगाई शहरात हल्ली तरुण मुले, बुलेट व इतर दुचाकीचा सायलेन्सर बदलून मोठा आवाज करणारा किंवा फटाक्यांसारखा आवाज करणारा सायलेन्सर लावतात आणि शांतप्रिय वस्तीमध्ये जाऊन तसेच मुख्य रस्त्यावर जाऊन गाडी अती वेगाने चालवतात. या सायलेन्सरचा खूप मोठ्या प्रमाणात आवाज करून सर्वसामान्य जनतेस त्रास देत वाहतुकीचे नियम पायदळी तुडवतात. अशा प्रकारांना चाप बसवण्यासाठी आता पोलीसांनी कठोर पावले उचलली असून थेट कारवाई करण्यात येत आहे.
बीड व अंबाजोगाई वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या आणि फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यात दुचाकीस्वारांकडून 10 बुलेटचे सायलेन्सर आणि 25 फॅन्सी नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या. त्यासोबतच त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.
वाहतूक पोलिसांनी ही कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमोले, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप, पोलीस हेडकॉन्स्टेबल नागरगोजे, उबाळे, वाघमारे, सारुक आणि अंबाजोगाई वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक घोडके, रोडे, महिला पोलीस हवालदार गायकवाड, पारवे, सांळुके यांनी केली आहे.