लोकप्रतिनिधींचं अपयश : केज मतदारसंघात ‘या’ गावात मतदानावर बहिष्कार

टीम AM : निवडणूक आली की, आश्वासनांची खैरात वाटायची, मतदारांना भावनिक करायचं आणि मतदान आपल्या पदरात पाडून घ्यायचं आणि निवडणूक जिंकायची. पुन्हा मतदारांना आणि त्यांच्या प्रश्नांना वाऱ्यावर सोडायचं आणि ठराविक लोकांसाठीचं आणि त्यांच्याच विकासासाठी राजकारणं करायचं. लोकप्रतिनिधींच्या या खेळाला जनता कंटाळली असून केज मतदारसंघातील कोरडेवाडीच्या ग्रामस्थांनी लोकसभेच्या निवडणुकीत एक धक्कादायक पाऊल उचलले. लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांना कंटाळून चक्क त्यांनी लोकसभेच्या मतदानावरचं बहिष्कार टाकला आहे. याची चर्चा मात्र सबंध जिल्ह्यासह राज्यात होत आहे. मतदानावर बहिष्कार म्हणजे केज मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं अपयशचं म्हणावे लागेल, अशीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. 

केज मतदारसंघात कोरडेवाडी हे गाव आहे. कोरडेवाडी गावात 2 हजार 130 मतदार आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या गावातील ग्रामस्थ साठवण तलावाची मागणी करीत आहेत. गावात साठवण तलाव झाला तर गावातील अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी त्यांची धारणा आहे. परंतू, त्यांच्या या मागणीकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले. लोकप्रतिनिधींना मतदान करून आपले प्रश्न सुटत नसतील तर मतदान करुन काय उपयोग ? असा सवाल त्यांनी उपस्थित करीत साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावा तरच मतदान करणार, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. 

दरम्यान, कोरडेवाडी गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. त्यांनी लागलीच त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जिल्हा प्रशासनाने या ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र, यातून कोणताच तोडगा निघाला नाही आणि ग्रामस्थं आपल्या निर्णयावर ठाम राहिले. कोरडेवाडी गावातील समस्येवर लवकरचं तोडगा काढला जाईल, अशी माहिती, बीडचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली. लोकसभेच्या निवडणुकीत केज मतदारसंघातील कोरडेवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. आता विधानसभेची निवडणूक काही महिन्यावर येवून ठेपली आहे. निवडणूकीच्या काळात लोकप्रतिनिधींनी मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी प्रयत्न करावेत, नाही तर केज मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या गावांचा आकडा वाढत जाईल, हे मात्र निश्चित आहे.