दु:खद बातमी : वार्तांकन करताना हृदयविकाराचा झटका, अंबाजोगाईत ‘आजतक’ च्या पत्रकाराचं निधन

टीम AM : लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी अंबाजोगाईत एक दु:खद घटना घडली आहे. मतदानाचे वार्तांकन करीत असताना ‘आजतक’ या वृतवाहिनीच्या पत्रकाराचं अंबाजोगाईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ही घटना आज दिनांक 13 मे रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेने माध्यम विश्वात शोककळा पसरली आहे. 

लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. या निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी ‘आजतक’ वृत्तवाहिनीचे मुंबई येथील प्रतिनिधी वैभव कनगुटकर [वय – 48] हे अंबाजोगाईत आले होते. आज सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर मतदानाचे वार्तांकन करीत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अंबाजोगाईत वैभव कनगुटकर यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंबाजोगाईतील माध्यमांच्या ग्रुपवर माहिती कळताच अनेक जणांनी शोक व्यक्त करीत त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.