टीम AM : ‘जंजीर’ हा चित्रपट आज 11 मे 1973 रोजी प्रदर्शित झाला होता. प्रकाश मेहरा यांच्या ‘जंजीर’ या चित्रपटाने संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवी दिशा दिली आणि गुलाबी स्वप्नरंजनात हिंदोळे खाणारा हिंदी सिनेमा ‘जंजीर’ चित्रपटानंतर सामान्य माणसाच्या संघर्षाचे आणि चुकीच्या गोष्टींविरोधात आपले म्हणणे मांडण्याचे साधन बनले.
चित्रपटाची पटकथा सलीम खान आणि जावेद अख्तर जोडीने लिहिली होती. अमिताभ बच्चन शिवाय जया बच्चन, प्राण, अजीत आणि बिंदू यांनी चित्रपटातील मुख्य भूमिकांसाठी काम केले होते. या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना ‘ॲंग्री यंग मॅन’ ची ओळख दिली. 1973 मध्ये आलेल्या या चित्रपटाने या आधीच्या त्यांच्या अनेक अयशस्वी चित्रपटांची मालिका संपुष्टात आणली.
या चित्रपटाचं नाव घेतलं तरी अनेकांना त्यातील काही सीन्स, डॉयलॉग्ज नक्कीच आठवतील. त्यातील प्रसिद्ध सीन… ‘लगता हैं इस इलाके में नये हो साब, वर्ना शेरखान को कौन नही जानता’, म्हणत शेरखानच्या भूमिकेतील प्राण पोलिस ठाण्यात इन्स्पेक्टर विजय खन्नाच्या (अमिताभ) समोरील खुर्चीवर बसतो. तेव्हा अमिताभ धाडकन् त्या खुर्चीला लाथ मारतो नि म्हणतो, ‘जब तक बैठने को ना कहां जाये, शराफत से खडे रहो. ये पुलिस स्टेशन हैं, तुम्हारे बाप का घर नही…’ आजही नुसतं आठवलं तरी किती अंगावर येतो हा सीन! पुढच्या पिढ्याही हा चित्रपट अन् यातील सीन्स मनात जपून ठेवतील, यात शंकाच नाही. कारण, काही कलाकृती अविस्मरणीय राहण्यासाठीचं बनत असतात. अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘जंजीर’ चा रीमेक 2013 मध्ये आला होता.
शब्दांकन : संजीव वेलणकर