अंबाजोगाईत अवकाळी पावसाचा हाहाकार : वीज पडून एक जण ठार

टीम AM : अंबाजोगाई शहरासह तालुक्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने आज [दिनांक 11 मे शनिवार] दुपारी थैमान घातले. अचानक पडलेल्या या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, तालुक्यातील घाटनांदूर येथे वीज पडून एक जणाचा मृत्यू झाल्याचीही घटना समोर आली आहे. 

अंबाजोगाई शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. गेल्या आठवड्यात पारा 40 अंशाच्या वर गेला होता. उन्हामुळे शहरातील नागरिक दुपारी घरीच राहणे पसंत करीत होते. परंतू, आज दुपारी मोठ्या प्रमाणात गर्मी होत असल्याने पाऊस येणार असे वाटत होते आणि झालेही तसे. दुपारपासून अवकाळी पावसाने शहरासह तालुक्यात हजेरी लावली. यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस यामुळे काही काळ उकाड्यापासून सुटका मिळाली असली तरी परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. 

घाटनांदूर येथे वीज पडून एकाचा मृत्यू

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे आज झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. रवी गोदाम [वय 27] असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या अवकाळी पावसात त्यासोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. 

झाड उन्मळून पडले

अंबाजोगाई शहरातही आज झालेल्या अवकाळी पावसात खतीब गल्ली परिसरातील शेख खमर व शेख फरमान यांच्या घरावर झाड उन्मळून पडल्याने दोन खोल्या व एक किराणा दुकान जमीनदोस्त झाले. यात सर्व संसारोपयोगी वस्तू उध्वस्त झाल्या, अशी माहिती प्राप्त झाली आहे.