टीम AM : बीड लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात असून महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. आज गुरुवार दिनांक 9 मे रोजी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अंबाजोगाई शहरात सभा होणार आहे. या सभेतून पवार कोणती तोफ डागणार आणि काय आवाहन करणार याकडे बीड लोकसभा मतदारसंघाचे लक्ष असणार आहे.
बीड लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. ही निवडणूक प्रामुख्याने भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यातच होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातूनही जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. तसेच प्रचारालाही गती देण्यात आलेली आहे. तसेच आतापर्यंत दोन्ही उमेदवारांसाठी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. सध्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून अजूनही मोठ्या सभा घेण्याचा धडाका सुरूच आहे. यामुळेच गुरुवारी अंबाजोगाईत शरद पवार यांची सभा होत आहे. ही सभा शहरातील मोंढा मैदानावर सांयकाळी 4 वाजता होत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी ही सभा असणार आहे. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सभेनंतर शरद पवार अंबाजोगाई शहरातचं मुक्काम करणार आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शरद पवारांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.