आजची मोदींची सभा विजयाचा संकल्प करण्याची नसून पंकजा मुंडेंच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी : धनंजय मुंडे
टीम AM : बीड जिल्ह्यात जवळपास सात लाखापेक्षा अधिक हेक्टर शेती ही जिरायती आहे. गोदावरीचे 165 टीएमसी तुटीचे खोरे भरून काढण्याच्या प्रकल्पास महायुती सरकारने तत्वतः मान्यता दिलेली आहे. हे तुटीचे खोरे भरून काढल्यास बीड जिल्ह्याला किमान 42 टीएमसी इतके पाणी मिळेल. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्याने बीड जिल्ह्यातील बहुतांश शेती ही बागायती होणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे प्रस्तावित खर्च एक लाख 17 हजार कोटी इतका असून, राज्य व केंद्र सरकारच्या एकत्रित अर्थसहाय्य याचबरोबर अन्य बँकांच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यासाठी मोदींची विकासाची गॅरंटी पंकजा मुंडे जिल्ह्यासाठी पूर्ण करू शकते, असा विश्वास कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अंबाजोगाई येथे आयोजित विजयी संकल्प सभेत धनंजय मुंडे बोलत होते. सभेला उपस्थित विराट जनसमुदाय पाहून ही सभा विजयाचा संकल्प करणारी नाही तर पंकजा मुंडेंच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी आहे, असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
बीड जिल्ह्याच्या नावापुढे लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसून काढण्यासाठी जिल्ह्यातील शेती जलयुक्त करणे, उस तोडणाऱ्या हातांना ऊस उत्पादक बनवणे, इथल्या लोकांना इथेच रोजगार मिळवून देणे, हे आमचे ध्येय असून, यासाठी पंकजांना संसदेत पाठवणे आवश्यक आहे, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, बीड जिल्ह्यात रस्ते व रेल्वेचे काम वेगाने सुरू असून, अंबाजोगाईला देखील घाटनांदूर वरून रेल्वेला जोडण्याची आमची अनेक वर्षांची मागणी सुद्धा आगामी काळात पंकजा या मोदींच्या नेतृत्वात पूर्ण करतील, अशी अपेक्षाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
मुंडे बंधू – भगिनींने मिळून मोदींना बांधला फेटा
दरम्यान, या सभेस संबोधित करण्यासाठी आलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठवाड्याची ओळख असलेला खास फेटा पंकजा मुंडे यांनी दिला, फेटा व्यवस्थित न बसल्याचे पाहून धनंजय पुढे सरसावले व तो फेटा धनंजय मुंडे यांनी बांधून व्यवस्थित बसवून दिला