टीम AM : वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन अंबाजोगाई शहरात दिनांक 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजता मोंढा मैदान येथे करण्यात आले आहे, अशी माहिती उमेदवार अशोक हिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन दिनांक 30 एप्रिल रोजी करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, अनिल डोंगरे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष खाजामिया पठाण, शहराध्यक्ष गोविंद मस्के यांची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत उमेदवार अशोक हिंगे यांनी माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी बोलताना अशोक हिंगे म्हणाले की, महाविकास आघाडीचा उमेदवार आयात केलेला असून पक्षप्रवेशाच्या सहा दिवस अगोदर ते माझ्या छातीत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा फोटो असल्याचे सांगत होते. त्यामुळे बजरंग सोनवणे हे डमी उमेदवार असून वंचित बहुजन आघाडीची लढाई थेट भाजपासोबतचं आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना अशोक हिंगे म्हणाले की, राज्यातील 20 लोकसभा मतदारसंघात भाजपाची आणि महाविकास आघाडीची छुपी युती आहे. बजरंग सोनवणे हे फक्त फेसबुकवरचे उमेदवार आहेत, अशी टीकाही हिंगे यांनी यावेळी केली.
मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता हिंगे म्हणाले की, भाजपाने मराठा समाजाची दिशाभूल करीत फसवे आरक्षण दिले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा समाजाच्या नोंदी सर्वत्र उपलब्ध आहेत, तरी देखील आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम महाविकास आघाडीच्याही सरकारने केले आहे. भाजपाच्या आणि महाविकास आघाडीच्याही भूमिकांना मतदार कंटाळला असून आता तो वंचित बहुजन आघाडीसोबत उभा राहिला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील लोकसभेची ही निवडणूक निर्णायक रहाणार आहे, असेही हिंगे म्हणाले. येत्या 3 मे रोजी होणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.