टीम AM : अंबाजोगाई शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसागणिक चोरीच्या घटना घडत आहेत. आनंदनगर मधील महिलेच्या गळ्यातील सोने चोरी केल्याची घटना ताजी असतानाच अज्ञात चोरट्यांनी डिक्कीतील तीन लाख रुपये लंपास केले आहेत. ही घटना प्रशांतनगर भागात दि. 30 एप्रिल रोजी घडली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, शहरातील प्रशांतनगर भागात रहाणारे अनिल नाथराव चव्हाण यांनी त्यांच्या मित्राला 5 लाख रुपये हात उसने दिले होते. सदरिल मित्राने त्यांचे घेतलेले पैसे ‘आयडिबीआय’ बॅंकेत ऑनलाईन जमा केले. दिनांक 30 एप्रिल रोजी ‘आयडिबीआय’ बॅंकेतून चव्हाण यांनी 5 लाख रुपयांची रक्कम काढली. त्यातील 2 लाख रुपये त्यांनी खिशात ठेवले आणि उर्वरित 3 लाख रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. दुचाकी घेऊन ते प्रशांतनगर येथील घरी आले. घरासमोर दुचाकी लावून ते घरात गेले. याच दरम्यान, दुचाकीला चावी राहिल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आले. परत बाहेर येऊन दुचाकीकडे पाहिलं असता डिकी उघडलेली दिसली आणि त्यातील 3 लाख रुपये लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, अंबाजोगाई शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे.