टीम AM : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन एसटी महामंडळ मिरवत असले तरी अंबाजोगाई आगाराचा कारभार मात्र ‘रामभरोसे’ चालू आहे. शहरातील बसस्थानक जरी चकाचक झाले असले तरी आगारातील बसेस मात्र मोडकळीस आलेल्या आहेत. याच मोडकळीस आलेल्या बसेस मधून प्रवाशांना पैसे खर्च करून प्रवास करण्याची वेळ आली आहे. पैसे घेता तर बसमध्ये सुविधा तरी द्या, अशी मागणी प्रवासी करित आहेत.
अंबाजोगाई आगाराचा उगम संघर्षातून झाला आहे. आगारासाठी अंबाजोगाईकरांना मोठे आंदोलन करावे लागले होते. आंदोलन केल्यानंतर आगाराची मागणी पूर्ण होऊन शहरातील मध्यवर्ती भागात एसटी महामंडळाचे बस आगार सुरु करण्यात आले. परंतू, या आगाराची परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून ‘जैसे थे’ अशीच आहे. मोडकळीस आलेल्या बसेस, कर्मचारी वर्गाचा अभाव आणि बसेस दुरुस्तीसाठी होणारी दिरंगाई यामुळे याचा फटका प्रवाशांना बसत आहे. शिवाय आगाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कामकाजावर लक्ष नसल्याने आगाराचे कामकाज पूर्ण कोलमडून गेले आहे.
अंबाजोगाई आगारात जवळपास वीस ते पंचवीस बसेस अशा आहेत जे की रस्त्यावर चालविण्याच्या स्थितीत नाहीत. तरी देखील या बसेस रस्त्यावर धावल्या जातात, त्याही लांब पल्ल्याच्या ठिकाणी. या बसेस मधील दरवाजे, सीटस् पुर्णपणे तुटलेली आहेत. या बसेस मध्ये तांत्रिक बिघाड असतानाही तारेवरची कसरत करीत प्रवाशांना पोहचविण्याचे काम चालक आणि वाहक करीत आहेत. प्रवाशांनाही ऐनवेळी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांनाही याच बसेसचा आधार घेत प्रवास पुर्ण करावा लागत आहे.
मोडकळीस आलेल्या बसेस दुरुस्त करा
अंबाजोगाई आगारातील मोडकळीस आलेल्या बसेस तात्काळ दुरुस्त करा, जेणेकरून प्रवाशांचा प्रवास सुखद होईल, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. शिवाय अंबाजोगाई बसस्थानकातून दिलेल्या वेळेत बसेस सुटत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना तासनतास बसची वाट पाहत स्थानकात बसावे लागते. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत बसेस सोडण्यात याव्यात, अशीही मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.