टीम AM : गोरगरिब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या ‘स्वाराती’ रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने त्याचा त्रास मात्र रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. अंबाजोगाई शहरातील खाजगी सिटी स्कॅनचे दर गोरगरीब रुग्णांना परवडत नसल्याने त्यांना परळी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांना आजारासोबत मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. दुसरीकडे अंबाजोगाईतील तथाकथित लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि वाढदिवसाच्या हारतुऱ्यात गुंग असल्याने त्यांना गोरगरीब रुग्णांच्या वेदनेची जाणीव होताना दिसून येत नाही. ‘स्वाराती’ रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन तात्काळ दुरुस्त करून रुग्णांसाठी उपलब्ध करावी, अशी मागणी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या रेडियोलॉजी विभागांतील सिटी स्कॅन मशीन गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. रुग्णालयाने शासनदरबारी अनेकदा प्रस्ताव पाठवून देखील त्याचा काही उपयोग होताना दिसून येत नाही. केवळ दुरुस्ती अभावी सिटी स्कॅन मशीन धूळ खात पडल्याने रुग्णांना एक तर जास्त पैसे देऊन खाजगीतून सिटी स्कॅन करून घ्यावे लागत आहे नाही तर परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन सिटी स्कॅन करून परत वापस यावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांची आणि नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे.
‘स्वाराती’ रुग्णालयाच्या रेडियोलॉजी विभागात 12 वर्षापूर्वी ‘फिलिप्स’ कंपनीची सिटी स्कॅन मशीन बसवली आहे. गेल्या 12 वर्षापासून या मशीनने अहोरात्र सेवा दिली आहे. कोरोना काळातही ही मशीन रात्रंदिवस रुग्णांसाठी सुरू होती. परंतू, गेल्या चार महिन्यापुर्वी या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही मशीन बंद पडली आहे.
जिल्हाधिकारी मुधोळ यांनी दिले 80 लाख
‘स्वाराती’ रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत, ही माहिती जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांना समजतात त्यांनी तात्काळ मशीन दुरुस्तीसाठी 80 लाख रुपयांचा निधी ‘स्वाराती’ रुग्णालयाच्या प्रशासनास उपलब्ध करून दिला. परंतू, फिलिप्स कंपनीच्या टीमने अहोरात्र मेहनत करुनही मशीन दुरुस्त झाली नाही.
शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे – अधिष्ठाता धपाटे
‘स्वाराती’ रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन गेल्या काही महिन्यापासून बंद आहे, ही बाब खरी आहे. मशीन दुरुस्तीसाठी आम्ही शासन स्तरावर आणि फिलिप्स कंपनीशी सातत्याने पत्रव्यवहार करत आहोत. गेल्या महिन्यात फिलिप्स कंपनीची एक टीमही मशीन दुरुस्तीसाठी आली होती. त्यांनी मशीन दुरुस्तीसाठी अहोरात्र मेहनत घेतली. मशीन सुरुही झाली, परंतू, एका तासात ती पुन्हा बंद पडली. अजूनही आमचे प्रयत्न सुरुच आहेत.
‘ते’ 80 लाख रुपये दिले नाहीत
‘स्वाराती’ रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी यांनी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मशीन दुरुस्तीसाठी फिलिप्स कंपनीची टीमही आली होती. त्यांनी मेहनत घेऊन मशीन सुरू केली, परंतू, पुन्हा एक तासाने मशीन बंद पडली. मशीनचे काही पार्ट बदलण्याची आवश्यकता आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, फिलिप्स कंपनीने मशीन दुरुस्त न केल्यामुळे आम्ही त्यांना पैसे दिले नाहीत. जिल्हाधिकारी यांनी मशीन दुरुस्तीसाठी दिलेले 80 लाख रुपये ‘स्वाराती’ प्रशासनाकडे आहेत, अशी माहितीही अधिष्ठाता डॉ. धपाटे यांनी दिली आहे.