टीम AM : जोगाईवाडी येथील सर्वे क्रमांक 17/ 1 मधील 9 एकर 8 गुंठे जमिनीच्या फेरफार प्रकरणावरून वाद निर्माण झाला असून, या प्रकरणात न्याय मिळावा आणि संबंधित तहसीलदारांच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी उपोषणकर्त्यांनी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणात श्रीमती विजयमाला सुखदेव कदम, श्रीमती शारदा मेघराज इंगळे, श्रीमती गयाबाई प्रभू धिमधिमे, श्रीमती लक्ष्मी रामा बोरोडे, सखाराम रामा धिमधिमे आणि केशरबाई लिंबाजी इंगळे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या उपोषणात अनेक वयोवृद्ध महिलाही सहभागी झाल्या असून, न्यायाच्या मागणीसाठी त्यांना उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागल्याने या प्रकरणाकडे लक्ष वेधले जात आहे.
उपोषणकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर जमीन संरक्षित कुळमालक रामा इसराणा (महार) धिमधिमे आणि घनश्याम पांडू (संतू) या नऊ मूळ कायदेशीर वारसांना डावलून दावा क्रमांक 270/2026 न्यायालयात प्रलंबित असतानाही 10 नोव्हेंबर 2026 रोजी बेकायदेशीर फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात तहसीलदार विलास तरंगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, संबंधित फेरफार प्रकरणाची तपासणी करावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
न्यायाच्या मागणीसाठी वयोवृद्ध महिलांनी आमरण उपोषण सुरू केले असून, प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले आहे.



