आमदार महोदया इकडे लक्ष द्या…. ‘स्वाराती’ रुग्णालयातील एक्स – रे मशीन महिना भरापासून बंद, गोरगरीब रुग्णात संतापाची लाट…!

टीम ‌AM : आशिया खंडातील सर्वात मोठे शासकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय म्हणून ओळख असलेले अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय सध्या विविध मुद्यांनी आणि समस्यांनी ग्रासले आहे. रुग्णालयातील एक्स – रे मशीन गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. एक्स – रे कक्षाला कुलूप लागले असून, दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना ताटकळत परत जावे लागत आहे. दरम्यान, केज मतदार संघाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी ‘स्वाराती’ च्या प्रशासनाकडे साफ दुर्लक्ष केल्याने गोरगरीब रुग्णात संतापाची लाट उसळली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अंबाजोगाईसह केज, परळी, धारूर, वडवणी तालुक्यातून शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. एवढ्या मोठ्या रुग्णालयात महिनाभर एक्स – रे मशीन बंद राहणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना खासगीतील हा 300 रुपयांचा खर्चही परवडत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण एक्स – रे न काढताच केवळ गोळ्या – औषध घेऊन घरी जात आहेत. त्यामुळे त्यांच्या आजाराचे योग्य निदानच होत नाही. एक्स – रे मशीन तातडीने दुरुस्त करून सुरू करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ…!

मशीनमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवला आहे का ?, याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. महिनाभरापासून मशीन बंद असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाही, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

मशीन धुळखात

एक्स – रे रूममध्ये मशीन धूळ खात पडून आहे. बाहेर मात्र रुग्णांची लांबच लांब रांग लागली आहे. हात – पाय फ्रॅक्चर झालेले, अपघातातील रुग्ण, छातीचे आजार असलेले रुग्ण एक्स – रेसाठी तासनतास वाट पाहत आहेत. शेवटी नाईलाजाने त्यांना खासगी सेंटरमध्ये जाऊन 300 रुपये मोजून एक्स – रे काढावा लागत आहे.

चार तास दवाखान्यातील एक्स – रे डिपारमेंटच्या समोर आम्ही बसलो होतो. परंतू कोणीही तिथे सांगत नव्हतं की एक्स – रे चालू आहे किंवा नाही. प्रशासनाने रुग्णांचे होणारे हाल थांबवावे. – रमेश सरवदे (पेशंट)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here