टीम AM : ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट 26 एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा विजय कोंडके यांनी सांभाळली आहे. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या अपूर्व यशानंतर निर्माता – दिग्दर्शक विजय कोंडके 33 वर्षानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने नात्यातील प्रेमाचे पदर उलगडून दाखविण्यास सज्ज झाले आहेत.
या चित्रपटात नयना आपटे, सविता मालपेकर, शुभांगी गोखले, यतीन कार्येकर, अभिजीत चव्हाण, प्राजक्ता हनमघर, ओंकार भोजने, कमलेश सावंत, सुरेखा कुडची या कलाकारांच्या भूमिका आहेत. सोबत गार्गी दातार हा नवा चेहरा आहे. ‘चित्रपटातील कुटुंबाच्या प्रेमाच्या नात्यांचा प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जाईल’, असा विश्वास दिग्दर्शक विजय कोंडके यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
‘विजय कोंडके यांचा चित्रपट’ आणि ‘उत्तम टीम’ यामुळे चित्रपट करायला लगेच होकार दिला, असं सांगताना हा कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल, असा विश्वास नयना आपटे, सविता मालपेकर आणि कमलेश सावंत यांनी व्यक्त केला. मध्यवर्ती भूमिका देतानाच विजय सरांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोलाचा होता, असं अभिनेत्री गार्गी दातार हिने सांगितलं.
या चित्रपटाची कथा – पटकथा – संवाद विजय कोंडके यांचे आहेत. छायांकन के. अनिकेत तर संकलन सुबोध नारकर यांचे आहे. विजय कोंडके आणि मंगेश कांगणे यांच्या गीतांना मनोहर गोलांबरे यांचे संगीत आहे. वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, मंदार आपटे, देवश्री मनोहर, स्वरा बनसोडे यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार तर कलादिग्दर्शन सतीश बिडकर यांचे आहे. कार्यकारी निर्माते सिद्धेश्वर नंदागवळे आहेत.