टीम AM : मराठवाड्यातील शांतताप्रिय शहर म्हणून अंबाजोगाई शहराची ओळख आहे. पण ही ओळख जवळपास पुसून गेली असून शहरात दररोज कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटना सर्रास घडत आहेत. काल तर शहरात दोन गटात तुफान राडा झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. पाटील चौक आणि ‘स्वाराती’ रुग्णालयात घडलेल्या या सिनेमा स्टाईल राड्याच्या घटनेमुळे अंबाजोगाईत चाललयं तरी काय ? अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करित आहेत.
अंबाजोगाई शहरातील पाटील चौक परिसरात बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी ‘आनंद मेला’ आला आहे. त्यामुळे सहाजिकच या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. गर्दीमुळे गाडी लावण्याच्या कारणावरून सदर बाजार आणि बाराभाई गल्लीतील युवकांच्या दोन गटात सांयकाळी तुफान हाणामारी या ठिकाणी झाली. त्यामुळे ‘आनंद मेला’ चा आनंद घेण्यासाठी आलेल्या बच्चे कंपनी आणि त्यांच्या पालकांची चांगलीच धांदल उडाली. हाणामारीची तीव्रता लक्षात घेऊन पालकांनी आणि बच्चे कंपनीने आपापल्या घरचा रस्ता धरला. हाणामारीची घटना इथेच न थांबता परत ‘स्वाराती’ रुग्णालयाच्या कॅज्युअलटीमध्ये घडली. याच हाणामारी करणाऱ्या दोन गटाने तिथेही गोंधळ घालत राडा केला. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशलमिडीयावर तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान ‘स्वाराती’ रुग्णालयात सुरक्षा रक्षकांनी कडक पावले उचलीत गोंधळ घालणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे अंबाजोगाई शहराची पुढील वाटचाल कशी राहणार याची चाहूल लागली आहे. अंबाजोगाई शहरात काल घडलेल्या या घटनेला पोलीसांनी गांभीर्याने घेतले असून शहर पोलीस ठाण्यात 16 जणांवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करित आहेत. अंबाजोगाई शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असून अंबाजोगाईकरांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे, तरच अंबाजोगाईतील सर्वसामान्य माणूस मोकळा श्वास घेऊ शकेल.