टीम AM : अंबाजोगाई शहरांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेपवाडी या गावात जबरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेपवाडीत एकच खळबळ उडाली आहे. राहत्या घरातून चोरट्यांनी 25 तोळे सोनं आणि 33 लाख रुपये रोकड असा एकूण 50 लाखांचा ऐवज लंपास केला आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. ही घटना 20 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, शेपवाडीत विष्णू शेप यांचे राहतं घर आहे. दिनांक 20 एप्रिल रोजी शेपवाडीपासून जवळच असलेल्या परिचय मंगल कार्यालयात विष्णू शेप आणि त्यांच्या घरातील मंडळी घराला कुलूप लावून लग्नासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याचं पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करित 5 कपाटातील 25 तोळे सोनं आणि 33 लाख रुपयांच्या रोकडीवर डल्ला मारत पोबारा केला. लग्न समारंभ उरकून आल्यानंतर विष्णू शेप आणि त्यांच्या घरच्यांना ही बाब निदर्शनास आली. त्यांनी लागलीच ही बाब पोलिसांना कळविली. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अंबाजोगाई शहरांसह आसपासच्या परिसरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांनी चोरीला आळा घालण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.