प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ८० वाहनांवर कारवाई

स्कूलबस पोलिस ठाण्यात अडकल्याने अनेक शाळांना अघोषित सुटी

अंबाजोगाई : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बुधवार व गुरुवारी शहरात वाहन तपासणी मोहिम जोरदार सुरू आहे. या मोहिमेत ८० वाहने विविध कारणांअभावी कारवाईसाठी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या प्रांगणात लावण्यात आली. यात स्कूल बस, जेसीबी, टिप्पर व अवैध वाहतूक करणाऱ्‍या अनेक वाहनांचा समावेश होता. मोठ्या प्रमाणात स्कूल बस पोलिस ठाण्यात अडकल्याने गुरुवारी अनेक शाळांना स्कूलबस अभावी अघोषित सुटी जाहिर करावी लागली.

अंबाजोगाई शहरात प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने टॅक्स न भरणे, वाहनांचा विमा, फिटनेस प्रमाणपत्र, अवैध वाहतूक करणारी वाहने, अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्‍या ८० वाहनांवर कारवाई करण्यात आली. विभागीय भरारी पथकाने बुधवारी व गुरुवारी ही कारवाई केली. या कारवाईत प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राजू नांगरे, सचिन बंग, उपसहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नितेश उमाळे, प्रविण गाढवे, कोमल मोरे, शुभम अकुलवार, अमोल रंगवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत ८० वाहने ग्रामीण पोलिस ठाण्याच्या प्रांगणात लावून या वाहनांना विविध कारणांवरून दंड देण्यात आला. मात्र, हा दंड भरण्याची सुविधा अंबाजोगाईत नसल्याने तो दंड लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात भरण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान अंबाजोगाईत प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आलेल्या वाहनांना दंड भरण्यासाठी लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागते. हा मोठा हेलपाटा, अंबाजोगाईकरांना निमूटपणे सहन करावा लागतो. या कारवाईदरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग यांच्याशी चर्चा करून दंडांची रक्कम अंबाजोगाईत भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मुंदडांच्या मागणीनंतर दंड भरण्याची सुविधा अंबाजोगाईतच उपलब्ध झाली आहे. दंड झालेल्या वाहन चालकांना तूर्त तरी लातूरचा हेलपाटा टळला आहे.